Sunday, 18 October 2015
रंगात रंगूनी जाऊया
रंगात रंगुनी जाऊया
गणेशोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर नवरात्रौत्सवाला प्रारंभ झालाय. नवरात्र सुरु झाल्यावर गरब्याच्या जल्लोषात तरुणाई धुंद होऊन जाते. तसंही नवरात्र म्हटले की गरबा हे एक समीकरण आहेच. परंतु अलिकडच्या काळात नवरात्र आणि नवरंग हे नवे समीकरण उदयास आले आहे. मागील काही वर्षापासून मुंबई नवरात्रीच्या नऊ दिवसात दर दिवशी एका ठराविक रंगात न्हाऊन निघते. नवरात्र सुरु होण्याच्या काही दिवस अगोदरपासूनच नवरात्रीतील नऊ दिवसांच्या रंगांची यादी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होऊ लागते. समस्त महिलावर्गात त्या रंगांची चर्चा घडू लागते. त्यानंतर जशी नवरात्रीला सुरुवात होते तशी पहिल्या दिवसापासूनच रेल्वे प्लॅटफाॅर्म , बसस्टाॅप, कार्यालये, बाजार, शाळा इत्यादी ठिकाणी खासकरुन महिला एकाच रंगाच्या विविध छटा असलेल्या पेहरावात दिसून येतात. त्यात साडी हा पेहराव प्राधान्याने असतो. या रंगोत्सवात आता पुरुषांचाही सहभाग वाढू लागलाय. त्यामुळे नवरात्रीच्या नवरंग उत्सवात निदान रंगांच्या बाबतीत तरी स्त्रीपुरुष समानता दिसते आणि संपूर्ण मुंबई एका रंगात उजळून निघते. शालेय जीवनातील गणवेशानंतर परत एकदा मोठी माणसे स्वेच्छेने एकरंगी गणवेश परिधान करतात असे वाटते. सुरुवातीला मटामधून एकाच रंगातील साड्या नेसलेल्या किंवा इतर पेहराव केलेल्या महिलांचे फोटो प्रसिद्ध केले जात. हळूहळू इतर वर्तमानपत्रांनीही तो कित्ता गिरवला. हल्ली तर वर्तमानपत्रातील एक पानच यासाठी राखून ठेवले जाते. महिला सहकार्यांबरोबर पुरुष सहकारीसुद्धा असे समूह फोटो काढून घेतात. फेसबुक, व्हाॅट्सअॅपवर सुद्धा एकरंगी फोटो पाहायला मिळतात. याचबरोबर या रंगांवर टिप्पणी करणारे विनोदही तयार केले जातात आणि झटपट पसरवलेही जातात. असे असले तरीही नवरंगांचा आनंद मात्र पुरेपूर घेतला जातो.
खरं पाहायला गेलं तर रंगांचा संबंध रंगपंचमी या सणाशी येतो. होळी पेटवल्यानंतर दुसर्या दिवशी साजरा केला जाणारा रंगपंचमी (धुळवड) हा सण खर्या अर्थाने अनेक रंगांची उधळण करणारा ठरतो. या सणादिवशी एकमेकांना रंगाने माखून संपूर्ण माहोलच रंगीबेरंगी केला जातो. परंतु या सणात कृत्रिम रंगांचा वापर वाढल्यावर व त्यांचा वारेमाप वापर होत असल्यामुळे रंगाचा बेरंग होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर नवरात्रीतला नवरंग मात्र एकूणच मनाला आनंद देणारा ठरतो आहे. या निमित्ताने का होईना बर्याच महिलांच्या ठेवणीतल्या साड्या बाहेर पडतात. कधी कधी असेही होते की एखादा रंग नसेल तर त्या रंगाची साडी खरेदी होते. महिलांबरोबरच पुरुषांकडे त्या त्या रंगाचा शर्ट, टीशर्ट असेल आवर्जून घातला जातो. नवरात्रीच्या दिवसात मुंबई एकरंगी दिसू लागते ती त्यामुळेच. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे असलेल्या मुख्यालयाची इमारतही या काळात ठराविक रंगाच्या प्रकाशात रात्री उजळून निघते. रंगपंचमीसारखे चेहरे यावेळी रंगाने माखले जात नाहीत आणि त्यामुळेच नवरात्रीतले रंग मनाला सुखावून जातात.
सर्व प्राणिमात्रांत मनुष्यालाच रंगाची जाणीव आणि ओळख असते असं संशोधन सांगते. त्यामुळेच की काय अगदी लहानपणापासूनच मनुष्याला रंगाचे आकर्षण असते. लहान मुलांना आकर्षक रंग आवडतात आणि अशा रंगांच्या खेळण्याकडे त्यांचे पटकन लक्ष जाते. त्यांना आवडणारे कार्टून्स म्हणूनच तर मुद्दाम लक्षवेधी आणि डोळ्यात भरतील अशा रंगसंगतीचे असतात. मोबाईल, टिव्ही यांचे लहान मुलांना आकर्षण त्यामुळेच तर असते. जसजसे मूल मोठे होऊ लागते तसतसे त्याच्या रंगजाणीवा समृद्ध होत जातात, रंग आवडू लागतात आणि पोशाख निवडताना रंगसंगतीला प्राधान्य दिले जाते. यातूनच एखादा रंग आवडता ठरतो. महत्वाच्या वस्तू मग त्याच रंगाच्या विविध छटात बाळगल्या जातात. तारुण्यात हे रंगप्रेम कमाल मर्यादा गाठते. वार्धक्यात रंगांची तेवढी आसक्ती राहत नाही. गात्रे थकलेली असतात. पण मन 'हिरवे' (ताजेतवाने या अर्थाने म्हणतोय नाहीतर वेगळाच अर्थ लावला जाईल!) असेल तर उरलेले आयुष्यही रंगतदार होऊ शकते.
आपली वसुंधरा, आभाळ , संपूर्ण सृष्टी रंगांचे विविध कलाविष्कार वर्षभरात दाखवत असते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस आभाळ अगदी रक्तवर्णापासून ते सोनेरी, तांबूस अशा छटांमध्ये उजळून निघते. वर्षाऋतुत तर धरणीमाता हिरवा शालूच नेसते. फुलपाखरांच्या पंखावर रंगांची एवढी विलक्षण उधळण असते की त्यांचे भिरभिरणे , फुलांवर बसणे , मकरंद चाखणे, तो गोळा करणे हे नुसते पाहणे डोळ्यांना सुखावह ठरते. सरडा तर सभोवतालच्या परिस्थितीनुसार रंग बदलू शकतो. दुनिया अशी रंगीबेरंगी असल्यामुळेच पृथ्वीतलावरील जीवन रंगारंग होऊन जाते.
या रंगांविना आयुष्याची आपण कल्पनाच करु शकत नाही. आता काही रंगांना विशिष्ट धार्मिक लेबलं लागल्यामुळे नकळत तशा रंगांकडे धार्मिक दृष्टीने पाहिले जाते. परंतु एक मात्र खरं सप्तरंग एकमेकांत मिसळूनच शांततेचा संदेश देणारा पांढरा रंग तयार होतो. तरी बरं नवरात्रीतील नवरंग उत्साहाने पाळले जातात. तसे सगळेच रंग माणसांना आवडतात. पण त्यातला एखादा रंग आवडीचा होतो. मग तो कुठलाही असू शकतो. असा आवडता रंग कुठलाही असू दे, परंतु मिळेल त्या रंगात मिसळून जाण्यातच खरी मजा असते आणि तेव्हाच आयुष्याला खरा अर्थ प्राप्त होतो आणि असे आयुष्य रंगीबेरंगी होऊन जाते.
Subscribe to:
Posts (Atom)