Saturday, 4 April 2015

बदल

दीपत्कार
November 19, 2014 at 6:25pm ·
बदल

मानवी आयुष्य इतके गुंतागुंतीचे आहे की बर्याचशा गोष्टी ठरवून सुद्धा होत नाहीत. तर काही अनपेक्षितपणे समोर येतात आणि मनाला सुखावून जातात. काहीजण अगदी वेळेचे नियोजन करून , ध्येय ठरवून आपली मार्गक्रमणा करतात. यात ध्येयपूर्ती झालेली माणसे यशस्वी ठरतात. ध्येयपूर्तता न झालेली अपयशी होतात. पण त्यातही अपयशापासून धडा घेऊन नव्याने उभारी घेऊन परत ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमणा सुरू करतात. काहींच्या समोर तर काहीच ध्येय नसते. आला दिवस ढकलायचा , गेलेल्या दिवसाचे दुःख नाही , येणार्या काळाची चिंता नाही असे मजेत यांचे चाललेले असते. त्यामुळे अनपेक्षितपणे एखादे संकट आले की मात्र यांचा गोंधळ उडतो. त्यावेळी मात्र आता हालचाल केली पाहिजे नाहीतर खरे नाही हे अशांना कळून चुकते. यातून तावून सुलाखून मार्ग काढून परिस्थितीवर मात करणारी माणसेच पुढील आयुष्यात आपले जीवन सुखकर करू शकतात. नाहीतर अपेक्षाभंग हा ठरलेलाच.

घोडा का अडतो? पान का नासते? व भाकरी का करपते? या तिन्ही प्रश्नांचे एकच ' न फिरवल्यामुळे म्हणजेच न बदलल्यामुळे'. बदल हाच आयुष्यातील स्थायीभाव आहे. परंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टीतच मानव गुंतून राहिला असता तर आजवर केलेली प्रगती त्याला साध्य करता आली नसती. माकडापासून उत्क्रांती होऊन मानवात झालेले रूपांतर हाही या बदलाचाच एक भाग. बदलाची अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजेच आपल्या रोजच्या जीवनक्रमात बदल करणे. डार्विनचा उत्क्रांतीविषयीचा सिद्धांत हा बदल याच तत्त्वावर आधारलेला आहे. परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेऊन आपल्यात बदल घडविणे किंवा प्राधान्यक्रम बदलणे याचे भान ज्याला असते तोच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो , जीवनप्रवासात तरून जाऊ शकतो. नाहीतर गटांगळ्या खाणे नशिबी आलेच. तसेही काही बदल आपोआप घडून येतात. पण जाणीवपूर्वक बदल घडवून आणून आपले जीवनक्रम बदलणाराच यशस्वी ठरतो !!

जाहिरात पत्रके

दीपत्कार
November 12, 2014 at 3:09pm ·
जाहिरात पत्रके

सध्याचे युग हे जाहिरातीचे युग आहे. जाहिरात ही पासष्टावी कला म्हणून याच युगात उदयास आली. आपल्या उत्पादनाची जाहिरात झाली नाही तर त्या उत्पादनाला ऊठाव मिळत नाही. याच विचाराने जाहिरातींचा मारा दिवसेंदिवस वेगवेगळ्या माध्यमातून होत असतो. दूरचित्रवाणीवर तर जाहिरात हाच मुख्य कार्यक्रम असून मालिका व इतर कार्यक्रम उरलेला वेळ भरण्यासाठी असतात असे विनोदाने म्ह्टले जाते. याचाच एक पारंपरिक अवतार म्हणजे जाहिरातीची पत्रके वाटणे. रस्त्यात, रेल्वे स्थानकाच्या बाहेर, रेल्वेपुलावर आणि इतरही बर्‍याच सार्वजनिक ठिकाणी हातात छोटीमोठी पत्रके घेऊन उभ्या असलेल्या व्यक्ती नजरेस पडतात. येणार्‍या जाणार्‍यांच्या हातात पत्रक दिले जाते. घरी टाकल्या जाणार्‍या वर्तमानपत्राच्या घडीतही ही पत्रके सरकावली जातात. या पत्रकांचे स्वरूप एखाद्या छोट्या कार्डपासून ते मोठ्या वहीच्या पानाएवढे असू शकते. कागदाचा प्रकारही साधा ते गुळ्गुळीत असतो. जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न ही पत्रके वाटून केला जातो. घरी वर्तमानपत्रातून मिळालेल्या पत्रकांचे ठिक आहे, पण इतर ठिकाणी हातात पडणारी ही पत्रके खरोखर किती वाचली जातात? बर्‍याच वेळा तर या पत्रकांवर नजर फिरवून ती लगोलग रस्त्यावरच फेकली जातात आणि रस्त्यावरून चालताना याच पत्रकांची रांगोळी काढलेली दिसते. म्हणजे जाहिरातदाराने केलेला खर्च वायाच जातो. त्यातच कागदाची नासाडीही होते.

सध्याच्या तंत्रज्ञानयुक्त युगात सगळीकडे 'कागदविहीन व्यवहार' होत असताना कागदाची ही नासाडी विरोधाभास ठरू पाहतेय. जुन्या काळात हे ठीक होते, पण आधुनिक युगात पर्यायी व्यवस्था उपलब्ध असताना पत्रकांचा वापर कमी व्हायला हवा. पत्रके छापणे अनिवार्यच असेल तर ती अशी फेकली जाणार नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे. भरपूर पत्रके छापण्यापेक्षा मोजकीच मोठ्या आकारातील पत्रके बनवून मोक्याच्या ठिकाणी पत्रक सर्वांना दिसेल असे हातात धरून व्यक्तीला उभे करावे. जाहिरात खरोखरच उपयुक्त असेल तर अवश्य वाचली जाईल आणि जाहिरातदाराचा उद्देशपण पूर्ण होईल. कागदांची नासाडी थांबेल. यामुळे 'पर्यावरण वाचवा' या मोहिमेला थोडा का होईना हातभार लागेल. अशा छोट्या छोट्या प्रयत्नांतूनच मोठ्या ध्येयाचा आपण पाठलाग करू शकतो

कुत्रा पुराण

दीपत्कार
November 8, 2014 at 9:07am ·
कुत्रा पुराण

आदिम काळापासून कुत्रा हा माणसाचा साथीदार राहिला आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास पुराणकाळातील धर्मराजाची साथ शेवटपर्यंत करणारा कुत्रा तर इतिहासातील शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा होय. श्री दत्तगुरुंच्या कुठल्याही तसबिरीत त्यांच्या आजुबाजूला कुत्रे असतातच. याच कुत्र्यांनी वेगवेगळ्या म्हणी, वाक्प्रचाराद्वारे माणसाच्या बोलीभाषेत, साहित्यात आपला ठसा उमटवला आहे. 'भीक नको पण कुत्रा आवर' , 'आंधळ दळतंय कुत्रं पीठ खातंय' , ' तुला नाही मला नाही, घाल कुत्र्याला', 'समर्थाघरचे श्वान' इत्यादी म्हणी, वाक्प्रचार प्रचलित आहेत. पुलंनी सुद्धा पाळीव कुत्रे व त्यांचे मालक याविषयी विनोदी अंगाने आपले अनुभव मांडले आहेते. इमानी कुत्र्याला केंद्रस्थानी ठेवून चित्रपटांची निर्मितीसुद्धा झालेली आहे. 'राजाने वाजवला बाजा', 'भालू' मराठीत तर हिंदीत 'तेरी मेहेरबानीया' हे चित्रपट आलेले होते. 'अपनी गलीमे तो हर कुत्ता शेर होता है' असेही संवादपण चित्रपटातून ऐकायला मिळतात. धर्मेद्रच्या प्रसिद्ध डायलॉगची सुरूवात तर 'कुत्ते, कमीने' नेच होत असे. मराठीत त्याची फोड 'कुत्ते , कमी ने' अशी करून विनोद तयार केले गेले आहेत. जॉनी लिवर तर आपल्या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातील कलाकारांचे त्यांच्याच आवाजात भुंकणारे कुत्रे असा विनोदी प्रयोग सादर करायचे. थोडक्यात या ना त्या प्रकारे 'कुत्रा' ह्या प्राण्याने मानवाचे जीवन व्यापलेले आहे. परंतु भटक्या कुत्र्यामुळे होणार्‍या त्रासामुळे अशा कुत्र्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली गेली आहे. मध्यंतरी भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो म्हणून त्यांना गोणीत भरून जाळण्याचा राक्षसी प्रयत्न झाला होता. परंतु त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे हे समजून त्यांचा त्रास टाळण्याकरता परिणामकारक उपाययोजना आखल्या गेल्या पाहिजेत.

या सर्व कुत्रापुराणानंतर पाळीव कुत्र्यांच्या मालकांचा एक मुद्दा येथे मांडावासा वाटतो. पाळीव कुत्र्यांना सकाळीच बाहेर फिरायला घेऊन जाणारे कुत्रामालक त्यांच्या कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी केलेल्या विष्ठेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. परंतु माझ्या पाहणीत एक परदेशी महिला कुत्रामालक आली होती. तीसुद्धा सकाळीच कुत्र्याला घेऊन फिरायला निघायची. पण तिचे वेगळेपण यात होते की जर तिच्या कुत्र्याने रस्त्यात घाण केली तर ती टिश्यूपेपरने ती विष्ठा छोट्या पिशवीत भरून आपल्याकडील पर्समध्ये ठेवायची. आज सकाळीसुद्धा अशीच आणखी एक विदेशी महिला कुत्रा फिरवताना दिसली. तिच्या हातातही छोटी पिशवी होती. या दोन्ही महिला त्यांच्या मायदेशी असलेले स्वच्छतेचे नियम भारतातही पाळत होत्या. या उदाहरणावरून भारतीय कुत्रामालक धडा घेतील काय

जीवन गणित

दीपत्कार
November 6, 2014 at 6:42pm ·
" जीवन गणित "

शालेय जीवनात वेगवेगळे विषय शिकविले जातात. ते शिकवण्याचा मुख्य हेतू मनुष्याने साक्षर होऊन त्या विषयाचे सखोल ज्ञान घेऊन पारंगत होण्याचा असतो. हे शिकलेले विषय पुढील आयुष्यात कुठल्या ना कुठल्या वळणावर नक्कीच भेटतात. भाषा , विज्ञान , इतिहास , भूगोल आणि गणित हे मुख्य विषय. प्रत्येकाच्या कलानुसार कोणता ना कोणता विषय हा आवडीचा असतो. पण एकूणातच विचार केला तर असे आढळून येते की गणित हा विषय बहुतेकांच्या यादीत नावडता विषय क्रमांक एकवर आढळतो.

परंतु गणित विषयाच्या सहाय्याने तर मानवाने मोठमोठी संशोधने केली आहेत. सुर्यमालेतील विविध ग्रहांचे आकारमान , वस्तुमान , सुर्यापासूनचे अंतर , प्रकाशवर्ष , मोठमोठाल्या इमारतींचे नियोजनबद्ध आराखडे , विविध यंत्रे गणितातील विविध परिमाणे वापरून सहजसाध्य केले. भारताने जगाला शून्य ही महत्त्वपूर्ण संख्या दिली. जिच्या सहाय्याने दशमान पद्धत जगभरात परिचित झाली. शकुंतलादेवीसारखी मानवी संगणक असणारी थोर भारतीय महिला तर गणितातील एक अद्भुत विदुषी होती. अत्यंत अवघड गणिते ती चुटकीसरशी सोडवित असे. आपल्याला मिळालेल्या निसर्गदत्त , उपजत गुणवत्तेचा योग्य वापर करून तिने गणितात विशेष प्राविण्य मिळवले होते. असा हा विषय नावडता कसा होऊ शकतो?

माझ्या मते अवघे आयुष्य हेच एक गणित आहे. नवीन कोणी जन्माला आला की बेरीज होते. एखादा मनुष्य या जगातून निघून गेला की वजाबाकी होते. लग्न झाले की अनेक नाती जुळली जातात आणि नात्यांचा गुणाकार होतो. हीच नाती तुटली की मात्र नात्यांचा भागाकार होतो. आयुष्याचे हे गणित ज्याला समजते तो तयार होणारी नाती जपण्याचा प्रयत्न करतो. त्यातून आनंद मिळवतो कारण त्याला माहित असते की नात्यांतून मिळणारा आनंद हा सम प्रमाणातील गुणोत्तराप्रमाणे वाढतच जातो !!

देवाचिये द्वारी । उभा क्षणभरी ।।

पत्कार
October 31, 2014 at 10:37pm ·
देवाचिये द्वारी । उभा क्षणभरी ।

नुकतेच मुंबईतील दोन प्रसिद्ध मंदिरात जाणे झाले. दोन्ही मंदिरात जाताना खणानारळाची ओटी म्हणून आपल्याकडचेच ताट घेण्याचा विक्रेत्यांचा आग्रह (?) आणि ते घेतल्यास पादत्राणे सांभाळण्याची तयारी दाखवली जात होती. तेही बरोबर आहे कारण दर्शन घेतानाच पादत्राणांकडे लक्ष असते. रांगेत थोडा वेळ गेल्यानंतर प्रत्यक्ष देवींचे दर्शन गर्दीमुळे ओझरतेच घेता आले. देवीसाठी आणलेले ओटीचे ताट पुजार्यांनी निर्विकार भावनेने घेऊन मानवल्यासारखे करून परत दिले.

संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेच आहे,
देवाचिये द्वारी । उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ती चारी । साधियेला ॥

म्हणजे क्षणभर जरी देवाच्या द्वारी गेलो तरी मोक्ष मिळेल. ज्ञानेश्वरांचे हे बोल जणू सर्वार्थाने खरे करण्याचा चंगच सुरक्षारक्षकांनी बांधला असावा. त्यामुळे क्षणभरच दर्शन घेऊन पुढे सरकण्यात शहाणपण असते. नाहीतर सुरक्षारक्षकांचा ' पुढे चला ' हा मंत्रघोष चालू असतो. हा एक प्रातिनिधीक अनुभव. पण तुम्ही कुठल्याही मंदिरात ( प्रसिद्ध ) गेलात तर थोड्याफार फरकाने हाच अनुभव येतो. गणेशोत्सवातील प्रसिद्ध राजाच्या दरबारीसुद्धा तसेच. एकूणच कुठल्याही मंदिरात गेलात तर श्रद्धेचा बाजार मांडलेला आढळेल. पूजेच्या ताटापासून ते प्रसादापर्यंत मनमानी किंमत आकारली जाते. भाविक देवासाठी ती मोजायला तयार असतात. कारण त्यांच्यामते देवाच्या दारी घासाघीश कशाला करा? ' देऊळ ' चित्रपटात यावरच विनोदी ढंगाने कोरडे ओढले आहेत.

नित्यनेमाने ठराविक मंदिरात ठराविक वारी जाणारे भाविक बरेचजण आहेत. त्यांच्या भक्तीभावाविषयी आदर आहे. परंतु प्रश्न असा पडतो या भाविकांना मनाजोगते दर्शन मिळते का?

श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा असू नये हे माझे प्रामाणिक मत!

स्वागतार्ह बाब

दीपत्कार
October 28, 2014 at 1:27pm ·
यंदाच्या दिवाळीत त्यामानाने आवाजी फटाक्यांची संख्या (काही नियमित अपवाद वगळता ) कमी झाली आणि शोभेच्या फटाक्यांची संख्या वाढली. त्यामुळे ध्वनिप्रदूषण थोड्या प्रमाणात का होईना कमी झाले परंतु वायुप्रदूषणात मात्र वाढ झाली. वास्तविक दिव्यांचा सण म्हणून साजरा होणार्या या सणाला मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रदूषणांचे गालबोट लागत आहे. यामुळेच दिवाळी सणात मुंबईबाहेर जाऊन दिवाळी सुट्टी पर्यटनस्थळी घालवण्याचा कल वाढतोय. तसेही रोजच्या जीवनात मुंबईकरांना ( किंबहुना मुंबईसारख्या शहरातील नागरिकांना ) वेगवेगळी प्रदूषणे चुकलेली नाहीत. सणासुदीच्या काळात त्यांचे प्रमाण वाढते इतकेच. वृत्तपत्रांतून , वृत्तवाहिन्यांतून वेळोवेळी त्याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध होतात, प्रबोधनपर संदेशही दिला जातो. परंतु नाही ' कळते पण वळत नाही ' अशी मनोवृत्ती असलेल्यांकडून प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने पावले पडताना दिसत नाहीत. उलट आहे त्या प्रदूषणांत भरच पडत जाते. ' स्वच्छ भारत' अभियानांतर्गत प्रदूषणमुक्त भारत मोहीम राबवण्यावर भर द्यावा. त्यायोगे प्रदूषणांचे दुष्परिणाम नागरिकांच्या मनावर सातत्याने बिंबवण्यात यावे. त्याचा पुढे जाऊन सकारात्मक परिणाम होईल हीच अपेक्षा. आणि मग खर्या अर्थाने दिवाळी हा सण मुंबईकर कुटुंबियासमवेतच दिव्यांची आरास करून साजरा करतील

अमंगळपणा कधी दूर होणार?

दीपत्कार
October 26, 2014 at 2:24pm ·
भारतीय शास्त्रज्ञ मंगळयान मोहीम यशस्वी करून अवकाश क्षेत्रात सुवर्णाक्षरी नोंद करण्याजोगी कामगिरी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय समाज अजूनही जातीव्यवस्थेच्या जंजाळातच गुरफटून पडल्याचे भीषण वास्तव वेळोवेळी समोर येणार्या दलितांच्या हत्याकांडाने अधोरेखित होते. खैरलांजी, सोनई, खर्डा आणि आता पाथर्डी ही यादी न संपणारी. पृथ्वीचे गुरूत्वाकर्षण भेदून अवकाशक्षेत्रात मारलेली भरारी कौतुकास्पदच पण त्याचबरोबर जातिभेदाचा चक्रव्यूह अजूनही भेदता आलेले नाही हे ही तितकेच जळजळीत प्रखर सत्य. वर्णव्यवस्था, आर्थिक विषमता, सामाजिक विषमता या समस्या जेव्हा मुळासकट उखडल्या जातील तोच खरा 'मंगळ'दिन.
32 people reached

दीपत्कार ब्लाॅगची सुरुवात - एक प्रस्तावना

दीपत्कार हे fb page मागच्या वर्षी म्हणजे २०१४ला दिवाळीच्या शुभमुहूर्तावर चालू केले. त्यावरील सर्व लिखाण या blog वर उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरूवातीला असेल. त्यानंतर दोन्ही ठिकाणी माझे लेख एकाचवेळी लिहिण्याचा प्रयत्न असेल.